लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, डोळ्यांत रंग जाण्यापासून ते जखम होणाऱ्या २१ जणांवर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपचार करण्यात आले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अपघात विभागात गुरुवारी दिवसभरात होळीमुळे अपघात झालेले, भांडणे होऊन जखमी झालेले व मद्यप्राशन केलेले असे ३३ जणांवर उपचार करण्यात आले. यातील कोणी गंभीर नसल्याची माहिती वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. सागर पांडे यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बुधवार रात्रीपासून होळीशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले, रंगपंचमीच्या दिवशी अपघात विभागात १२० रुग्ण दाखल झाले यातील ५५ रुग्ण होळीशी संबंधित तर मेडिसीन अपघात विभागात दाखल झालेल्या १५९ रुग्णांमधून १३ रुग्ण हे होळीशी संबंधित होते. हे रुग्ण मारामारीत, अपघातात किरकोळ जखमी झालेले व पोलिसांच्या ‘ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझर’या मशीनमध्ये सापडलेले होते.
नेत्ररोगाचे दोन रुग्ण गंभीरमेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, होळीच्या दिवशी २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली. यात प्रौढांमध्ये १९ तर लहान मुलांमध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे. प्रौढांमधील दोन रुग्णांच्या डोळ्यात रसायनयुक्त रंग गेल्याने बुबुळाला जखम झाली. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यातील एकाने स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णालयातून सुटी घेतली तर दुसºया एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर १९ रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.