नासुप्र सभापतींनी केली पाहणी : दोन टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घर या योजनेवर नागपूर सुधार प्रन्यासने काम सुरू केले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात नासुप्रतर्फे दोन टप्प्यात तब्बल २१ हजार ३६५ प्लॅट बांधण्यात येणार आहेत. शहरातील गरिब नागरिकांना याचा लाभ मिळेल. नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. आता बांधकामाला गती देण्यासाठी संबंधित जमिनीचे माती परीक्षण केले जाणार असून त्यासाठी निविदा काढल्या जातील. या योजनेंतर्गत नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात १२,३४६ घरकूल उभारण्यात येणार आहे. यात मौजा तरोडी खुर्द येथे २,९६०, तरोडी बुजरुक येथे १०३३, गोन्ही सीम १७६० तर मौजा वाठोडा येथे ५९८ घरकूल उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मौजा भरतवाडा व पुनापूर येथे ४,१९५, वांजरी ५,१४२, जयताळा ११३९, मौजा डिगडोह १४१६, सक्करदरा येथे ४५४ असे एकूण २१,३६५ घरकूल उभारण्यात येणार आहेत. या बांधकामाला गती मिळावी यासाठी जमिनीच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नासुप्रतर्फे बांधण्यात येणाऱ्या मौजा वांजरी व हजारीपहाड येथील जागांची म्हैसेकर यांनी पाहणी केली. वांजरी येथे ६८८ तर हजारीपहाड येथे १७०० घरकूल उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना लवकरच पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळेल, अशी नासुप्रला अपेक्षा आहे. यावेळी सुनील गुज्जलवार, पंकज पाटील व अधिकारी उपस्थित होते.
गरिबांसाठी २१ हजारावर फ्लॅट
By admin | Published: July 25, 2016 2:27 AM