लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत.विधान सभेच्या सदस्यांनी आॅनलाईन पद्धतीने १,५५८ तर विधान परिषदेच्या सदस्यांनी ५५५ लक्षवेधी सूचना संबंधित विभागाकडे पाठवल्या. या लक्षवेधी सूचना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न, पाणी टंचाई, वाढती गुन्हेगारी, बनावट बी- बियाणे, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्यासह इतर विविध विषयांशी संबंधित आहेत.साहित्यासोबत आलेल्या प्लास्टिकचे रेनकोट घालून कामविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून सुरू होणार आहे. ही तारीख जवळ येत असल्याने येथील सर्वच काम वेळेवर पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. दरम्यान गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे येथील प्लास्टिकचे शेड तयार करण्याच्या कामात बरेच व्यत्यय येत होते. त्यापासून वाचण्यासाठी आणि काम कायम सुरू राहावे म्हणून कामगारांनी अधिवेशनासाठी विविध साहित्याच्या पॅकिंगमध्ये आलेले प्लास्टिक गोळा केले . या प्लास्टिकचा पाण्यापासून वाचण्यासाठी कामगारांनी गुंडाळून रेनकोट म्हणून वापर केला. विधिमंडळाच्या विविध भागात कामगार प्लास्टिकचे रेनकोट घालून एकमेकांसोबत अधून मधून हास्य विनोद करीत होते.विधिमंडळ सचिवालय सुरू झाले आहे. कर्मचारी अधिकारी नागपुरात आधीच दाखल झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे २९ जून रोजी येत आहेत.