नागपूर : ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ असलेल्या तरुणीला अनोळखी फोनवर ‘ओटीपी’ शेअर करणे महागात पडले. अगोदर तिच्या खात्यात २.१२ लाखांची रक्कम कर्ज म्हणून ‘क्रेडिट’ झाली व काही वेळातच तिच्या खात्यातून १.३८ लाख रुपये ‘डेबिट’ झाले. कुठल्याही कर्जाची मागणी केली नसताना सायबर गुन्हेगारांकडून तिच्या नावावर कर्ज काढून ते तिच्या खात्यात वळते करण्यात आले व तिच्या खात्यातून रक्कम काढून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकारनगरजवळील जयवंतनगर येथील साक्षी विंचूरकर (२३) या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ असून त्या फेब्रुवारी २०२२ पासून ‘वर्क फ्रॉम होम’ आहेत. ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर ८६०९४७९७४८ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. समोरील महिलेने तिचे नाव श्रेया शर्मा असे सांगितले व क्रेडिट कार्डवरील ‘कार्ड प्रोटेक्शन प्लॅन’ सुरू ठेवायचा असेल तर दोन हजार रुपये भरावे लागतील, अशी माहिती दिली. कुठलाही प्लॅन सुरू ठेवायचा नाही असे साक्षी यांनी सांगितले असता समोरील महिलेने प्लॅन निष्क्रिय करण्यासाठी प्रक्रिया सांगितली. त्यानुसार मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ साक्षी यांनी तिला दिला. काही वेळातच साक्षी यांच्या बँक खात्यात २ लाख १२ हजार रुपये जमा झाले. याबाबत साक्षी यांनी विचारणा केली असता तुमच्या खात्यात पर्सनल लोन जमा झाले आहे, असे सांगण्यात आले. मला कुठलेही कर्ज नको असे साक्षी यांनी म्हटले असता त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून एक लाख रुपये डेबिट झाले. त्यानंतर बँक खात्यातील ६० हजार रुपये क्रेडिट कार्डच्या खात्यात वळते करण्यात आले व त्यामुळे त्यांची क्रेडिट लिमिटदेखील वाढली. साक्षी यांना त्यांचे बँक खाते हाताळताच येत नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने बँकेच्या कस्टमर केअरवर फोन करून माहिती दिली. त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये व क्रेडिट कार्डातून ३८ हजार रुपये काढण्यात आले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साक्षी यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी फोनवरील श्रेया शर्मा व तिच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.