नागपूर : शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागासाठी आतापर्यत २१ हजार ६२४ विद्यार्थ्यानी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने पसंतीच्या शाळांतील प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे. आरटीई अंतर्गत शहरातील नोंदणीकृत ६२२ शाळांत ७ हजारांहून अधिक जागा आहेत. परंतु आलेल्या अर्जाचा विचार करता एका जागेसाठी सरासरी तीन दावेदार असल्याचे चित्र आहे. केजी वन व पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची संख्या ६० टक्के आहे. उर्वरित प्रवेश अर्ज नर्सरी व इतर वर्गातील प्रवेशासाठी करण्यात आलेले आहे. अर्ज न भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत २ मार्चपर्यत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत पुन्हा दोन ते अडीच हजार अर्ज येण्याची शक्यता आहे. अर्जाची संख्या पुन्हा वाढली तर प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे. अर्जाची संख्या विचारात घेता सोडत पद्धतीने आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. २ मार्चला अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सोडत काढली जाणार आहे. पालकांना एसएमएस व्दारे यांची माहिती दिली जाणार आहे.(प्रतिनिधी)
आरटीईसाठी २१६२४ अर्ज
By admin | Published: February 26, 2017 2:11 AM