लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक शहरातील जगनाडे चाैकात केलेल्या कारवाईमध्ये गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक केली. त्याच्याकडून दोन किलाे १९ ग्रॅम गांजा आणि ॲक्टिव्हा असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २३) मध्यरात्री करण्यात आली.
मनीष शंकरलाल चंद्रोल (३०, रा. बह्मणी-बंजार, जि. मंडला, मध्य प्रदेश) व इकबाल रमजान शेख (३५, रा. नैनपूर, जि. मंडला, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना भंडारा जिल्ह्यातून खिंडसीमार्गे रामटेकच्या दिशेने गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी रामटेक शहरातील जगनाडे चाैकात नाकाबंदी केली.
यात त्यांनी ॲक्टिव्हाने (क्र. एमएच ३६ एएच ४५९५) जाणाऱ्या दाेघांची झडती घेतली. त्यांच्याकडील पिशवीत दोन किलाे १९ ग्रॅम गांजा आढळून येताच दाेघांनाही अटक केली. ते गांजाविक्रेते असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले असून, त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा गांजा आणि ६५ हजार रुपयांची ॲक्टिव्हा असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी नारकाेटिक ड्रग्ज ॲण्ड सायकाेट्राॅपिक पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार नाना राऊत, दिनेश आधापुरे, राजेंद्र रेवतकर, सत्यशील कोठारे, विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ, अमोल कुथे, आशुतोष लांजेवार यांच्या पथकाने केली.