आरटीओची कारवाई : २६ बसेसना नोटीसनागपूर : गतीवर नियंत्रण मिळवून वाढते अपघात रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविण्यात आले. परंतु अनेक बसमालकांनी वेग नियंत्रकामध्ये छेडछाड करून वेग मर्यादा वाढविली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेल्या या बेलगाम स्कूल बसेसवर आज गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने पुन्हा कारवाई केली. २६ स्कूल बसेसना नोटीस बजावत २२ स्कूलबसेस जप्त केल्या. ‘लोकमत’ने नुकतेच ‘नागपुरातील ३८८ स्कूल बसेस बेलगाम’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आरटीओने ही कारवाई केली आहे.महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार (स्कूल बस) नियम २०११ मधील नियम १० (अठरा) नुसार महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या स्कूल बसचा वेग ४० तर हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटर प्रति तासाची मर्यादा निश्चित केली आहे. १ मे २०१२ पासून सर्व स्कूल बसना वेग नियंत्रक बसविण्याची सक्ती करण्यात आली. परंतु यामुळे बस फेऱ्या कमी झाल्या. आर्थिक फटकाही सहन करावा लागत होता, म्हणून यावर अनेकांनी नवी शक्कल लढविली. थेट वेगनियंत्रकामध्ये बदल करुन ६० ते ७० किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा वाढविली. ‘लोकमत’ने ४८८ स्कूल बसेसमधून ३८८ स्कूल बसेस नियमांची पायमल्ली करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आणली. याची दखल घेत आरीटीओ शहर कार्यालयाने ही दुसऱ्यांदा कारवाई केली. आज झालेल्या कारवाईत २२ बसेसनी आपली वेग मर्यादा वाढवून घेतल्याचे आढळून आले. या बसेसला जप्त करून इतर २६ बसेसना नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.(प्रतिनिधी)
२२ बेलगाम स्कूल बसेस जप्त
By admin | Published: November 28, 2014 12:58 AM