लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर पालकांची २२ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विक्रांत दिनेश गेडाम (३०), दिनेश गेडाम (वडील) आणि उमेश गेडाम (काका) रा. रामनगर अशी आरोपीची नावे आहे. फिर्यादी प्रवीण समर्थ (५२) रा. आरटीओ आॅफिस मागे सिव्हील लाईन्स यांच्या मुलीचा गेल्या वर्षी राजस्थानच्या मेडिकल कॉलेजमध्ये डेंटलमध्ये नंबर लागला होता. दरम्यान त्यांच्या पत्नीला एका मैत्रिणीने सांगितले की, त्यांचे एका नातेवाईकाच्या मुलीला विक्रांतने वर्धा सावंगी मेघे येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून दिली होती. परंतु विशेष कोट्यासाठी काही लाख रुपये द्यावे लागतात. समर्थ दाम्पत्य मुलीला दूर पाठवण्याऐवजी वर्धेत एमबीबीएस करण्यासाठी तयार झाले. त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये विक्रांतशी संपर्क साधला. विक्रांतने त्याचे मेघे कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचे सांगून १७ लाख रुपयात अॅडमिशन करून देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून शिफारस पत्रही व्हॉट्सअॅपवर पाठवले. त्याच्यावर विश्वास करून समर्थ दाम्पत्याने विक्रातला १४ सप्टेंबर रोजी ८ लाख रुपये दिले. यानंतर तो पुण्यात आल्याचे सांगून त्याचे वडील व काकाला घरी पाठवून पैसे मागविले. १५ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतरही त्यांच्या मुलीची अॅडमिशन झाली नाही. त्यांच्याप्रमाणेच सुनीता गजानन कात्रे यांनीही आपल्या मुलीच्या अॅडमिशनसाठी ६.५ लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे आरोपीनी दोन्ही पालकांची २२ लाख ३५ हजाराने फसवणूक केली. चौकशीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एमबीबीएसमध्ये प्रवेशाच्या नावावर २२ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:25 AM
मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर पालकांची २२ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देमेघे कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचे सांगून फसवणूक