अर्चना चौधरीसह चौघांवर गुन्हा दाखल : सावनेरच्या बीडीओंनी केली तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : शासनाच्या विविध योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने दहेगाव (रंगारी)च्या सरपंच, सचिवासह माजी सरपंच आणि माजी सचिवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सावनेरच्या खंडविकास अधिकारी माणिक हिमाणी यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विद्यमान सरपंच अर्चना किशोर चौधरी, ग्रामविकास अधिकारी आर. एस. औतकर, माजी सरपंच गोपाल लहानू रामेकर, ग्रामसेवक बेलखेडे अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी विद्यमान सरपंच अर्चना चौधरी या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी यांच्या पत्नी आहे. ग्रामपंचायत दहेगाव रंगारी येथील अभिलेखात अनियमिततेबाबात आणि भ्रष्टाचाराची सखोल तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक चार सदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे लेखा अधिकारी एन. पी. धनविजय (समिती प्रमुख), कनिष्ठ लेखा अधिकारी (वित्त) भालचंद्र खोत, नरखेड पंचायत समितीचे रामदास गुंजरकर, नागपूर पंचायत समितीचे शाखा अभियंता जी. एम. पंखराज यांची नियुक्ती करण्यात आली होती. या चार सदस्यीय समितीने आपल्या तपासणीचा अहवाल जि.प. सीईओ यांना दिला असून वरील चौघांनाही अनियमिततेसाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर आणि त्यांची चमू तसेच सावनेरच्या खंडविकास अधिकारी हिमाणी व त्यांच्या चमूने सोमवारी (दि. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतमध्ये जाऊन रेकॉर्डची तपासणी केली. तीन तास चाललेल्या तपासणीदरम्यान १ एप्रिल २०१३ ते १८ आॅगस्ट २०१६ या कालावधीत २१ लाख ८६ हजार ६६५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. १४ वा वित्त आयोग आणि १२ विविध योजनांच्या कामामध्ये हा गैरव्यवहार आहे. हा गैरव्यवहार माजी सरपंच गोपाल लहानू रामेकर, माजी ग्रामसेवक बेलखेडे, विद्यमान सरपंच अर्चना चौधरी, ग्रामविकास अधिकारी आर. एस. औतकर यांनी केल्याचे या तपासणीत आढळले.
२२ लाखांच्या अपहारात सरपंच अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:04 AM