लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तासभर जोराचा पाऊस झाला तर नागपूर शहरातील ७० ठिकाणी पाणी साचते. अतिवृष्टी झाली तर २२ झोपडपट्ट्यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात या धोकादायक ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, त्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना प्रशासनाच्या हाती नाहीत.
अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यातील विविध भागात मोठे नुकसान झाले. १४ जुलै १९९४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर शहर पाण्याखाली आले होते. २०१८ मध्ये तर नागपुरातील पावसाळी अधिवेशन काळात विधिमंडळ इमारतीतच पाणी साचले होते. दोन आठवड्यापूर्वी ८ जुलै २०२१ रोजी झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचले होते. याचा विचार करता मुसळधार पाऊस झाल्यास नागपूर शहरातही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.
पावसाचे पाणी वाहून जाणारी यंत्रणा नाही
सलग तासभर जोराचा पाऊस झाला तर शहरातील ७० ठिकाणी दोन फुटाहुन अधिक पाणी साचते. वाहतूक विस्कळीत होते. आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरते. त्यात नव्याने बांधण्यात आलेले सिमेंट रोड जमिनीहून उंच आहे. बाजूला पावसाळी नाल्याची व्यवस्था योग्य प्रकारे नाही. पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याची देखभाल व दुरुस्ती होत नाही. कचरा व गाळ साचून असल्याने पावसाचे पाणी तुंबत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अंडरब्रिजमध्ये पाणी साचते
नरेंद्र नगर आणि लोखंडी पुलाच्या खाली वर्र्षानुवर्षे पाणी साचण्याची समस्या आहे. असे असतानाही अलिकडे बांधलेल्या बांधलेल्या मनीषनगर, कॉटन मार्केट, झिंगाबाई टाकळी येथील पुलांबाबत काळजी घेण्यात आली नाही. जोराचा पाऊस आला की या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते.
२२ झोपडपट्ट्यांना धोका
शहरात नागनदी, पिवळीनदी व पोहरा नदींचा समावेश आहे. तर शहरात २२७ नाले वाहतात. नदी-नदी नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. जोराचा पाऊस आला की यातील २२ झोपडपट्ट्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांच्या मनात कायम भीती असते.
अशी आहेत पाणी साचणारी ठिकाणे
रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ महाविद्यालयाच्या मागे, तेलंखेडी तलाव परिसर, गवळीपुरा धरमपेठ, पांढराबोडी, हजारी पहाड, आदर्शनगर, शांतिनगर, ताजनगर, आझादनगर, राणी दुर्गावती नगर, बौद्धनगर, पुनापूर, सूर्यनगर, नोगा कंपनी, आंबेडकर पुतळा (मानकापूर), मोतीबाग (माताटोळी), मोतीबाग भोसलेवाडी, वंजारा, पडोळे हॉस्पिटल चौक, नवभारत प्रेस वर्धारोड, नरेंद्र नगर पूल, कॉटन मार्केट पूल, कॉटन मार्केट भुयारी मार्ग, मनीषनगर भुयारी मार्ग, गांधीनगर, पावनभूमी, लोकांची शाळा (रेशीमबाग), नंदनवन, भुतेश्वर नगर, शिवाजीनगर (जुना लकडगंज), कुभारटोली, शास्त्रीनगर, पडोळेनगर, हिवरीनगर, संजय नगर, पंचशीलनगर चांभार नाला, फुलेनगर, झिंगाबाई टाकळी, गरीब नवाज नगर, यशोधनानगर, हमीद नगर, गुलशन नगर, संतोषनगर, बालाजीनगर झोपडपट्टी, सक्करदरा तलाव झोपडपट्टी, राणी भोसलेनगर झोपडपट्टी, गोवा कॉलनी (गड्डीगोदाम), कामगार नगर,नारा, चुनाभट्टी, उज्ज्वल नगर, एम्प्रेस मिल कॉलनी, नरेंद्रनगर अग्शिमन स्थानकासमोर, झांशी राणी चौक, मानस चौक, गीता मंदिर सुभाषनगर, जवाहर सिमेंट रोड, रेशीमबाग चौक, गीतांजली सिनेमा गृहाजवळ, बडकस चौक, गड्डीगोदाम चौक, तिरपुडे कॉलेज समोर, संगम रेस्टॉरन्ट मेडिकल चौक, विदर्भ शाळा ओमनगर.