नागपूर : अंबाझरी तलाव परिसर आणि जॉगिंग ट्रॅकवरून मनपा कर्मचाऱ्यांनी तब्बल २२ टन कचरा साफ केला. या परिसरातील जवळपास ७० टक्के सफाई करण्यात अली. श्रमदान अभियान अंतर्गत आयोजित या साफसफाई मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा झोनच्या ५०० कर्मचाऱ्यांसह मनपाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सफाई केली. महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर हे सक्रियपणे या अभियानात सहभागी झाले होते. रविवारी सकाळी ७ वाजता सर्व झोनचे अधिकारी व पदाधिकारी अंबाझरी परिसरात एकत्र जमले आणि स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. तीन तास चाललेल्या या अभियानात संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोनच्या सभापती वर्षा ठाकरे, हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, धंतोली झोनच्या सभापती लता घाटे, महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी जिचकार आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. एक किलोमीटर लांब असलेल्या अंबाझरी तलाव परिसराला दहा भागांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक भाग १०० मीटरचा होता. प्रत्येक भागाची सफाई करण्यासाठी झोनचे सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. स्वच्छतेसोबतच त्या भागातील झुडपे, गवत आदी हटविण्यात आले. यापूर्वी २ मे रोजी अंबाझरी तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या मोहिमेत श्रमदान केले. (प्रतिनिधी)तलावात दूषित पाणी जाऊ नयेप्रवीण दटके यांनी मनपा आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्यासोबत अंबाझरी तलावाची मोटार बोटने पाहणी केली. यावेळी तलावात दूषित पाणी जाऊ नये. याची विशेष काळजी घेण्यात यावी. स्वच्छता काम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
अंबाझरीतून निघाला २२ टन कचरा
By admin | Published: May 11, 2015 2:06 AM