नागपूर : केकचे दुकान चालविणाऱ्या एका तरुणाने रामदासपेठ येथे विष प्राशन करून आत्महत्या केली. विशेष म्हणजे विष प्राशन केल्यानंतर त्याला त्याची चूक उमगली व त्याने त्याच्या भावाला फोन करून मला काहीही करून वाचव, मला मरायचे नाही असे म्हटले. त्याचे हे शब्द अखेरचेच ठरले व त्याचा अखेर मृत्यू झाला. रोहनसिंह जमशेदसिंह कपूर (वय २२, रामनगर) असे मृतकाचे नाव आहे.
सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता रोहनने दुचाकीवर बसून रामदासपेठ येथील दुर्गा मंडप गाठला. तेथे दुचाकी उभी करून तो जमिनीवर बसला. त्याने एका व्यक्तीला भाऊ वीरपाल सिंह याचा मोबाईल क्रमांक देत त्याला फोन लावायला सांगितले. भाऊ मला वाचव, मला जगायचे आहे, मला मरायचे नाही, मी विष घेतले आहे, असे त्याने वीरपालला सांगितले. वीरपाल तातडीने तेथे पोहोचला व त्याने रोहनसिंहला दुचाकीच्या मागे बसविले. त्याने त्याला बांधून घेतले व लता मंगेशकर इस्पितळात घेऊन गेले. उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तेथे पोहोचले.
रोहनसिंह अगोदर ऑनलाईन फळ वितरणाचे काम करायचा. त्याने एका मैत्रिणीसोबत फुटाळ्याजवळ केकचे दुकान सुरू केले होते. दोघेही केकची होम डिलिव्हरी करायचे. रोहनच्या खिशातून विषाच्या दोन पुड्या सापडल्या. त्याने प्रेयसीमुळे रागाच्या भरात हे पाऊल उचलल्यांच बोललं जात आहे. त्याची प्रेयसी इंस्टाग्रामवर काही पुरुषांना फॉलो करत असल्याने त्याने हे अस केलं असावं, असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणावरून दोघांमध्ये अनेक वाद झाल्याचंही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली कि यामागे दुसरे काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.