नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. किसान रेल्वेची पहिली फेरी बुधवारी २०० टन संत्रा घेऊन आदर्शनगर दिल्लीला रवाना झाली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या अथक परीश्रमाने गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. या किसान रेल्वेचा फायदा काटोल, नरखेड, वरुड आणि मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील शेतकऱ्यांना झाला. या किसान रेल्वेत एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ही किसान रेल्वे प्रत्येक बुधवारी गोधणी ते आदर्शनगर दिल्ली आणि प्रत्येक शनिवारी वरुड ते शालीमार धावणार आहे.
मागील वर्षी रेल्वेला मिळाले २.५ कोटी रुपये
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०२० मध्ये किसान रेल्वे चालविण्यास सुरुवात झाली. मागील वर्षीही शेतकऱ्यांनी किसान रेल्वेला भरघोस प्रतिसाद दिला होता. मागील वर्षी २९ किसान रेल्वेच्या माध्यमातून एकुण ७५०० टन संत्र्याची वाहतुक करण्यात आली होती. यातील १८ किसान रेल्वे शालीमारला, तर ११ किसान रेल्वे आदर्शनगर दिल्ली येथे पाठविण्यात आल्या होत्या. यात व्यापारी आणि शेतकऱ्यांना १.५ कोटी रुपयांचे थेट अनुदान मिळाले होते. तर रेल्वेलाही २.१५ कोटी रुपयांचा महसुल किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळाला होता.