नागपूर : गणेशोत्सवानंतर राज्यातील २ हजार २८४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी (२५ ऑगस्ट) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. गेल्यावेळी या टप्प्यातील निवडणूक ही २८ सप्टेंबरला पार पडली होती. मात्र, यावेळी १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम असते. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच नि वडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागातील सूत्रानुसार ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.