नागपूर : मध्य भारतातील रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नागपूरच्या मेडिकलमधील ‘कॅन्सर हॉस्पिटल’च्या बांधकामासाठी ७६ कोटींना मंजुरी मिळाली असून, प्रस्तावित जागेवर लवकरच बांधकाम होणार आहे. परंतु त्यापूर्वी २३ कोटींच्या ‘लिनिअर एक्सलेटर’ खरेदी करण्याच्या प्रयत्नाला मेडिकलने सुरुवात केली आहे. या यंत्रामुळे कॅन्सर रुग्णांवर अद्ययावत उपचार होणार आहेत.
तोंडाचा कॅन्सरमध्ये विदर्भ राजधानी ठरू पाहत आहे. शिवाय स्तन, गर्भाशय, फुफ्फुस व अन्ननलिकेच्या कॅन्सरचे रुग्ण वाढले आहेत. याची दखल घेऊन शासनाने नागपूर मेडिकलमधील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करून ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला मंजुरी दिली. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची तरतूदही केली. पूर्वी हे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास करणार होते. आता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत केले जाणार आहे. बांधकामाला घेऊन हा प्रकल्प रखडत चालला असताना, २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाल्याने गती आली. तळमजल्यासह तीन मजल्याच्या इमारतीच्या बांधकामाच्या नकाशाला मंजुरी मिळाली. परंतु टीबी वॉर्ड परिसरात जाटतरोडी भागात प्रस्तावित असलेल्या या हॉस्पिटलची जागा मेडिकलच्या नावावर नसल्याने निविदा प्रक्रिया रखडली. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी यात पुढाकार घेऊन नवीन जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडताच, त्यांनी प्रस्तावित जागेवर बांधकाम सुरू करण्याच्या मंजुरीचे पत्र दिले. यामुळे लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय, २३ कोटींच्या ‘लिनिअर एक्सलेटर’ची खरेदी प्रक्रिया पूर्ण करून, ती तातडीने मेडिकलमध्ये उपलब्ध करण्याच्या हालचालींना डॉ. गुप्ता यांनी वेग दिला आहे.
-कॅन्सर हॉस्पिटलचे बांधकाम व यंत्राला प्राधान्य ()
मेडिकलचे प्रस्तावित असलेल्या हॉस्पिटलच्या बांधकामाचा नकाशा तयार झाला असून, लवकरच बांधकामाला सुरुवात होईल. याशिवाय, ‘लिनिअर एक्सलेटर’ यंत्राच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘कॅन्सर हॉस्पिटल’चा फायदा विदर्भातीलच नव्हे तर मध्य भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना होईल.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल