शंकरबाबांच्या हस्ते होणार वाटप : पारडसिंगा येथे आज सामूहिक विवाह सोहळाकाटोल : श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सोमवारी (दि. ९) आयोजित सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड तालुक्यातील २३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अक्षयतृतीयेच्या पर्वावर श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. सर्वधर्मीय विवाह सोहळा व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने काटोल व नरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पैसे गोळा केले. जमा झालेली रक्कम कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या २३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील २३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रोख १५ हजारांची आर्थिक मदत शंकरबाबा यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना दिली जाणार आहे. शंकरबाबा पापळकर हे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस, अनाथाश्रमात १२३ अंध, अपंग, अनाथ मुलामुलींचे परतवाडा जवळील वज्झर फाटा येथील अनाथालयात संगोपन करीत आहेत. या सोहळ्याला शंकरबाबांची विशेष उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल देशमुख यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
२३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
By admin | Published: May 09, 2016 2:59 AM