लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हा एकमेव उपाय आहे. यासाठी २५ कोटींच्या निधीतून प्रत्येकी ११ आसनी क्षमतेची २०० लसीकरण वाहने नागपूर आणि अमरावती विभागासाठी खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांमधून नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार येईल, तसेच जिल्ह्यात २३ ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरू आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनरेगा आयुक्त अंकित गोयल, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे, या विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सह पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यावेळी उपस्थित होते.
कोराडी महामार्गावर नारा डेपो येथे इंदिरा गांधी बायोडायव्हर्सिटी पार्क निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. नागपूर शहराला वीजतारामुक्त करण्यात येणार असून, भूमिगत वीजवाहिन्यांवर भर देण्यात आला आहे.
- शहीद वीरपत्नींचा गौरव
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नी प्रमिला नरेश बडोले, वीरपत्नी वंदना बाबूराव डोंगरे, वीरपत्नी कल्पना सुनील नखाते यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच काेरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
- शेतजमीन पट्टे वाटप
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग कार्यालय सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांच्याकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत गुंफाबाई दिगंबर मानकर, लीलाबाई अर्जुन डोंगरे, नंदाबाई बबन पाटील, रंजना सिद्धार्थ पाटील, विजय गजानन बावने, हरिचंद महादेव वानखेडे आणि कुणाल मधुकर लोखंडे या लाभाार्थ्यांना शेतजमीन पट्टे वाटप करण्यात आले.