नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत ऑगस्ट महिन्यात झालेली घसरण सप्टेंबर महिन्यात किंचीत वाढताना दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात १८३ रुग्ण आढळून आले असताना २६ सप्टेंबरपर्यंत २३३ रुग्णांची नोंद झाली. रविवारी ६ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,२६९ झाली असून ११ दिवसांपासून मृतांची संख्या १०,१२० वर स्थिर आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद एप्रिल महिन्यात झाली. त्यानंतर मे महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होणे सुरू झाले. जून महिन्यात २,४४७ रुग्ण आढळून आले असताना जुलै महिन्यात ५०६ तर ऑगस्ट महिन्यात १८३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत आणखी घट होण्याची अपेक्षा होती. परंतु मागील २६ दिवसात २३३ रुग्णांची नोंद झाली. यामुळे पुढील महिन्यात ही संख्या वाढणार की कमी होणार, याकडे आता तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
-शहरात १५८, ग्रामीणमध्ये ४५ तर जिल्ह्याबाहेर ३० रुग्ण
सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत शहरात १५८, ग्रामीणमध्ये ४५ तर जिल्ह्याबाहेरील ३० रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या तिन्ही भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. रविवारी बाधित आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी १ रुग्ण आहे. आज १५ रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात कोरोनाचे ७९ रुग्ण सक्रिय आहेत.
-चार महिन्यातील कोरोनाची स्थिती
जून : २,४४७ रुग्ण
जुलै : ५०६ रुग्ण
ऑगस्ट : १८३ रुग्ण
सप्टेंबर : २३३ रुग्ण
(२६ पर्यंत)
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४,०१२
शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,२६९
ए. सक्रिय रुग्ण : ७९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८३,०७०
ए. मृत्यू : १०,१२०