रामटेक : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक हाेऊ घातली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवार, दि. ३०) विविध प्रवर्गातील एकूण ९१ जागांसाठी २३६ उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. सर्वाधिक ४३ उमेदवारी अर्ज पंचाळा ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी दाखल करण्यात आले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांनी तहसील कार्यालयात एकच गर्दी केली हाेती. गर्दी लक्षात घेता अर्ज दाखल करण्याची वेळ थाेडी वाढवून देण्यात आली हाेती. शिवाय, ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली हाेती.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख हाेती. ऑनलाईन अर्ज भरण्यास येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि गर्दी लक्षात घेता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सायंकाळी ६ वाजेपर्यंत भरण्याची सूट देण्यात आली हाेती. रामटेक तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील ३३ प्रभागामधून ९१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी २०,००१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. किरणापूर ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, खुमारी येथील ११ जागांसाठी २७ अर्ज, पथरई येथील ९ जागांसाठी १४ अर्ज, चिचाळा येथील ११ जागांसाठी २५ अर्ज, देवलापार येथील १३ जागांसाठी ३९ अर्ज, पंचाळा येथील ११ जागांसाठी सर्वांत जास्त ४३ अर्ज, शिवनी येथील ११ जागांसाठी २५ अर्ज, दाहाेदा येथील ९ जागांसाठी २० अर्ज, मानापूर येथील ९ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मस्के यांनी दिली.