नागपूर : गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या नोकरानेच साथीदारांच्या मदतीने २.३७ लाखांचे लॅपटॉप चोरी केल्याचे उघड झाले असून धंतोली पोलिसांनी नोकरासह त्याच्या दोन साथीदारांना गजाआड केले आहे.
बादल अन्नाजी वाघ (२०, रा. सरस्वतीनगर, तकीया धंतोली) असे गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या आरोपी नोकराचे नाव आहे. अजहर अहमद शेख (४४, रा. रजनीबाई शाळेजवळ, महादेवपुरा वर्धा ह. मु. ऑरेंजसिटी टॉवर पत्रकार भवन रोड धंतोली) यांचा लॅपटॉप विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी बादल अजहर यांच्या गोडाऊनमध्ये नोकर म्हणून कामाला आहे. बादलने १७ सप्टेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आपल्याकडे असलेल्या गोडाऊनच्या चाबीने गोडाऊन उघडून वेळोवेळी ३ लाख ८० हजार १६८ रुपये किमतीचे लॅपटॉप चोरी केले.
अजहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी तांत्रीक तपास करून आरोपी नागेश कचरु वानखेडे (२२, रा. फकीरावाडी झोपडपट्टी धंतोली) यास ताब्यात घेतले. नागेशने ही चोरी आपण बादल आणि जयंतसिंग उर्फ जितु उर्फ जितेंद्र भरतसिंग चव्हाण (३०, रा. गुनेक चौक, गोरखपूर मध्यप्रदेश) यांच्या सोबत मिळून केल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक करून २ लाख ३७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, उपनिरीक्षक अल्लानुर शेख, सुभाष वासाडे, बाळु जाधव, ऋषभ निशीतकर यांनी केली.