लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाने कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडवर कचरा संकलनासाठी निर्धारित रकमेच्या तुलनेत २४.६० कोटींचे जादाचे बिल उचलल्याचा आरोप केला होता. यातूनच कनकचे बिल रोखण्याचा निर्णय घेण्याला आला होता. याविरोधात कनकने ऑर्बिटेशनमध्ये धाव घेतली होती. आर्बिटेटर आर.सी.चव्हाण यांनी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्याने कनककडून रक्कम वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कनकने जादाची २१.२८ कोटींची रक्कम उचलली होती. यावरील व्याजासह २४.६० कोटी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याला कनकने ऑर्बिटेशनमध्ये आव्हान दिले होते. घराघरातून कचरा संकलन करण्याचा महापालिका व कनक यांच्यात २००८ मध्ये १० वर्षांसाठी करार झाला होता. त्यानुसार घराघरातून कचरा संकलन करून तो भांडेवाडी येथे वाहून नेण्यासाठी प्रति मेट्रिक टन १०३३.६८ रुपये दर निश्चित करण्यात आला होता. करारातील तरतुदीनुसार या दरात वेळोवेळी वाढ करण्यात आली. वर्ष २०१६ पर्यंत संबंधित रक्कम कनकला देण्यात आली. एप्रिल २०१६ मध्ये कनक रिसोर्सेसने प्रति मेट्रिक टन १६०६ दराने बिल देण्याचा प्रस्ताव सादर केला. यात राज्य सरकारने निर्धारित केलेल्या किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना वेतन द्यावयाचे असल्याने कचरा उचलण्याच्या खर्चात वाढ झाल्याचे म्हटले होते. जुलै २०१२ ते मार्च २०१३ दरम्यान कनकला ४७ लाख ५९ हजार ८३८ रुपये जादा देण्यात आल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले होते.घाऊक किमतीच्या निर्देशांकानुसार दर तीन महिन्यात शुल्कात बदल करण्याच्या फॉर्म्युल्यावरही आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शुल्कात सुधारणा करून प्रति मेट्रिक टन १३०६ दराने रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कनकला २४.६० कोटी अतिरिक्त देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यातील ८.७६ कोटी महापालिकेने थकीत बिलातून एकरकमी वसूल केले. तसेच दर महिन्याच्या बिलातून १.४२ कोटी वसूल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कनकने ऑर्बिटेशनमध्ये आव्हान दिले होते. महापालिकेतर्फे अॅड. ए.एम.काजी यांनी बाजू मांडली. त्यांना लेखापाल देवेंद्र इंदूरकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक प्रकाश बरडे व राहुल झांबरे यांनी सहकार्य केले.
कनककडून २४ कोटी वसुलणार : न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:43 PM
ऑर्बिटेटर आर.सी.चव्हाण यांनी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्याने कनककडून रक्कम वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्देमनपाचा मोठा विजय : निर्धारित शुल्काच्या तुलनेत अधिक रकमेची वसुली