नागपूर : खोट्या कागदपत्रांच्या आधारे एनआयटीचे तब्बल २४.३५ लाखांचे भूखंड बळकविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीने आणखी असे कारस्थान केले आहेत का याचा शोध सुरू आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
नारी येथे एनआयटीच्या मालकीचे खसरा क्रमांक १५५-१, १५५-३, १५५-४, १५५-५, १५५-८ हे भूखंड आहेत. मात्र २०१७ साली हे भूखंड काही खाजगी व्यक्तींच्या नावे झाल्याची बाब समोर आली. याचे तपशील काढला असता दीपक त्र्यंबक देशमुख व किशोर त्र्यंबक देशमुख (वाठोणा, आर्वी, वर्धा), मुग्धा नंदकिशोर पाठक (मानसमंदिर चौक, वर्धा), जयश्री किसनराव कस्तुरे (नरेंद्रनगर), ज्योती चंदन जामगडे (जेठपुरा, चंद्रपूर) यांच्या नावे ही जमीन असल्याचे स्पष्ट झाले. या आरोपींनी २६ मे २०१७ रोजी नगर भूमापन अधिकारी-२ येथील अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून आखीव पत्रिकेत बदल करवून घेतले. तसेच आरोपींनी खसरा क्रमांक १४१-१ व १४२-२ या एनआयटीच्या मालकीच्या जमिनीबाबतदेखील असाच प्रकार केला. ती जमीन त्यांनी २०१८ साली विक्रमसिंह गुज्जरला विकली. हा प्रकार समोर आल्यानंतर एनआयटीचे विभागीय अधिकारी कमलेश टेंभुर्णे यांनी आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.