दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. शासनाने मदत केल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य झाले. यात ऑनलाईन क्लासेसमुळेही पास काढणारे विद्यार्थी घटल्यामुळे एसटीच्या नागपूर विभागाला जवळपास २४ कोटींचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती आहे. एवढी मोठी रक्कम बुडाल्यामुळे आधीच आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेली एसटी आणखीनच संकटात सापडली आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळ चांगलेच अडचणीत सापडले आहे. एसटीची चाके ठप्प झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. शासनाकडे विविध सवलतींची असलेली रक्कम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. अद्यापही एसटीच्या प्रवाशांची संख्या हवी तशी वाढली नाही. यात भर पडली ती शाळकरी विद्यार्थ्यांची. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दरवर्षी २१ हजार विद्यार्थी पास काढून प्रवास करतात. परंतु ऑनलाईन क्लासेसमुळे ही विद्यार्थी संख्या केवळ २६०५ वर आली असल्यामुळे नागपूर विभागाला ६१ कोटींचा फटका बसला आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये एकूण २१ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी पास काढली. त्यांचे प्रत्यक्ष प्रवासभाडे २४ कोटी ५३ लाख ११६४ रुपये होते. परंतु सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांकडून केवळ ६ कोटी ५३ लाख १०८९६ वसूल करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेल्या सवलतीच्या पोटी यावर्षी शासनाकडून एसटीने १८ कोटी ९३ लाख २२२६८ रुपये वसूल केले. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये एकूण २१ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी पास काढली. त्यांचे प्रत्यक्ष प्रवासभाडे २८ कोटी ६२ लाख ८७५६२ होते. परंतु विद्यार्थ्यांकडून केवळ ५ कोटी ९९ लाख ८७२०२ रुपये वसूल करण्यात आले. सवलतीच्या पोटी यावर्षी शासनाकडून एसटीला २२ कोटी ५२ लाख ८९३६० रुपये मिळाले. परंतु कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे आणि ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यामुळे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात केवळ २६०५ विद्यार्थ्यांनीच पास काढली. १९ हजार पास काढणारे विद्यार्थी या वर्षी कमी झाले. त्यांचे प्रत्यक्ष प्रवासभाडे ४ कोटी ९७ लाख ९२ हजार ८२४ होते. परंतु विद्यार्थ्यांकडून केवळ ४२ लाख ८१४८७ रुपये वसूल करण्यात आले. सवलतीच्या पोटी शासनाकडून ४ कोटी ५५ लाख ११३३७ रुपये एसटीला मिळाले. या वर्षी एसटीला तब्बल २४ कोटींचा फटका बसला आहे. एकट्या नागपूर विभागाला एवढा मोठा फटका बसल्यामुळे एसटी आणखीनच अडचणीत सापडली आहे. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे सुरू झाल्यानंतरच हा तोटा भरून निघणार आहे.
...............
ऑनलाईन क्लासेसमुळे एसटीला फटका
‘एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला दरवर्षी विद्यार्थ्यांच्या पासेसमुळे जवळपास २८ कोटी रुपये मिळतात. परंतु बहुतांश शाळा, महाविद्यालये सुरु झालेली नसल्यामुळे आणि ऑनलाईन क्लासेस सुरु असल्यामुळे या वर्षी हे उत्पन्न केवळ ४.९७ कोटीवर आले असून एसटीला २४ कोटींचा फटका बसला आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
.........