नागपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या २४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये दहा टक्के आरक्षणातून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियमित नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी जारी केले आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून संघर्ष करीत असलेले २४ कर्मचारी सुखावले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांची प्रथमच जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना ज्या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक(लिपिक) - ५, पशुधन पर्यवेक्षक - ०१, आरोग्य सेवक- ०५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - १, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - १, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) - १, कंत्राटी ग्रामसेवक - ७ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - ०३ अशा विविध २४ पदांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मागील आठवड्यात दहा परिचरांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. तसेच लेखा संवर्गातील ६ कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती देण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विपुल जाधव यांनी २४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी स्वागत केले आहे.