नागपूर : शुक्रवारी रात्र गडगडाटासह जाेराचा पाऊस झाला. मात्र, शनिवारी सकाळी आकाशातून ढगांची गर्दी कमी हाेताच, तापमान वाढायला सुरुवात झाली. २४ तासांत दिवसाचे तापमान ५.३ अंशाने वाढून ३४.७ अंशापर्यंत पाेहोचले. सकाळी पावसाच्या अनुकूल परिस्थिती असल्याने आर्द्रता ९८ टक्क्यावर पाेहोचली. शहरात सकाळी ८.३० वाजतापर्यंत ८.५ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, तसेच देशातील अनेक भागांत वातावरणातील बदल दिसून येत आहेत. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत आकाशात ढग दाटलेले राहतील. थाेड्या-थाेड्या अंतराने पाऊस येण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, नागपुरात शनिवारी ऊन-सावलीचा खेळ चालला हाेता. मात्र, पाऊस झाला नाही. शुक्रवारी रात्री पाऊस झाल्यानंतरही किमान तापमानात १.१ अंशाची घट झाली व ते १८.१ अंश नाेंदविण्यात आले. नागपूरबरोबरच विदर्भातील इतर ठिकाणीही पाऊस झाल्याची माहिती येत आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक २३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. याशिवाय यवतमाळमध्ये ६, गाेंदियात ३.२, अमरावतीमध्ये २.८, अकाेलामध्ये ०.६ तर गडचिराेलीमध्ये १ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.