लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात आज दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस झाला. दिवसभरात २४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे सायंकाळी होणारा उकाडा काहीसा कमी झाला आहे.सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. हवामान विभागानुसार ढग दाटून येत असल्यामुळे पाऊस होत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहील. कमाल तापमान १.२ डिग्री वाढून ३४.८ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. आर्द्रता ८७ ते ९५ टक्क्यांवर कायम आहे. परंतु पावसामुळे रात्रीच्या वेळी होणारा उकाडा दूर झाला आहे.आतापर्यंत १,२७४ मिमी पाऊसमान्सूनसंदर्भात यंदा नागपुरातील परिस्थिती चांगली राहिली. एक जून ते २८ सप्टेंबरपर्यंत नागपूर शहरात १२७४.७ मिमी इतक्या पावसाची नोेंद करण्यात आली आहे. आतपर्यंत पडलेला हा पाऊस सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक आहे. परंतु विदर्भातील परिस्थिती मात्र चांगली नाही. विदर्भात आतापर्यंत ८४८.४ मिमी पाऊस झाला आहे. तो सरासरीपेक्षा १० टक्के कमी आहे. या काळात ९३७.८ मिमी इतका पाऊस होतो. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.पावसाचा जोर कमी कधी होणार?सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानादेखील अद्याप नागपुरात पाऊस कायमच असल्याचे चित्र आहे. सोमवारी दुपारनंतर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. तासभराहून अधिक कालावधीत २४ मिमी पाऊस पडला. मंगळवारीदेखील ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी तरी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोमवारी सकाळी ऊन पडले होते. मात्र दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले व काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पावणेसहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. २४ तासांत शहरात २४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीहून ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
नागपुरात २४ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:29 AM