नागपूर : राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील ४ वर्षात विषप्रयोग आणि वीजप्रवाहामुळे २४ वाघ आणि ५४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकाराखाली उघडकीस आलेल्या शिकारीच्या प्रकरणांची माहिती वनखात्याने दिली आहे. राज्यात एकीकडे वाघांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे त्यांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढतच आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हे आणखी एक कारण स्थानिक शिकारींमागे आहे.
वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याघ्र संरक्षर दल आहे. प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही खात्याची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत आहे. तर, अशीच काहीशी स्थिती बिबट्यांबाबतचीही आहे. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढत असून त्यात शिकारीचे प्रमाणही वाढत आहे. ज्या वाघ आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य पर्यटन सुरू आहे, त्यांच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.