नागपूर : तातडीने बिल न भरल्यास वीज कापली जाईल असा मॅसेज पाठवून अॅपच्या माध्यमातून पैसे भरायला लावून २ लाख ४१ हजार ४७७ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय पितळे (५९, प्लॉट नं. २५५, धरमपेठ एक्स्टेंशन) हे आपल्या घरी हजर असताना त्यांच्या मोबाइलवर इलेक्ट्रिक बिल न भरल्यास आज लाइट बंद करण्यात येईल, असा मॅसेज आरोपीने केला. इलेक्ट्रिक बंद होण्याच्या भीतीने पितळे यांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईलधारक आरोपीने त्यांना प्ले स्टोरवरून इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम टाकून टर्म व्हिवर क्विक सपोर्ट `अॅप डाउनलोड करण्यास सांगून १६० रुपये ऑनलाइन भरायला लावले. पितळे यांनी एचडीएफसी ऑनलाइन बँकिंगने पैसे भरले असता आरोपीने त्यांना चेक करण्यास सांगितले.
त्यानंतर पितळे यांना बिल पेंडिंग दिसल्याने त्यांनी आरोपीला संपर्क साधला असता आरोपीने त्यांना ऑटो फॉरवर्ड एस. एम. एस. अॅप डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर पुन्हा एसबीआय ऑनलाइनमधून पितळे यांना पेमेंट अपडेट करण्यास सांगितले. पितळे यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून २ लाख ४१ हजार ४७७ रुपये कपात झाल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (डी) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
..............