६८० शाळांनी केली होती नोंदणी : कोरोनाच्या काळात पालकांकडून मिळाला उत्तम प्रतिसाद
नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना नामांकित शाळेत प्रवेश घेण्याची संधी मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हजारो विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत आठव्या वर्गापर्यंत नि:शुल्क शिक्षण यामुळे मिळाले आहे. नागपूर जिल्ह्यात आरटीईसाठी दरवर्षी पालकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. यंदाही ५,७२९ जागांसाठी २४,१६८ पालकांनी अर्ज केले आहेत.
विनाअनुदानित शाळांची लाखो रुपये फी भरणे सामान्य पालकाच्या आवाक्याबाहेर होते. आपलाही मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, या पालकांच्या अपेक्षा आरटीईमुळे पूर्णत्वास आल्या. नागपुरात २०१२ पासून सुरू झालेल्या आरटीईच्या प्रक्रियेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद लाभत आला आहे. गेल्या वर्षी ४० हजारापर्यंत अर्जांची संख्या गेली होती. कोरोना असतानाही ९० टक्के प्रवेश आरटीईअंतर्गत झाले. यावर्षी आरटीईची प्रक्रिया फेब्रुवारीपासून राबविण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात ६८० शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली. २५ टक्क्यानुसार यंदा ५,७२९ जागा आरक्षित करण्यात आल्या. ३ मार्चपासून पालकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. ३० मार्चपर्यंत २४,१६८ पालकांनी आरटीईत नोंदणी केली होती.
- पॉईंटर
आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची नोंदणी - ६८०
एकूण जागा - ५,७२९
एकूण अर्ज - २४,१६८
- तालुकानिहाय आलेले अर्ज
तालुका अर्जांची संख्या
भिवापूर ७३
हिंगणा १४३२
कळमेश्वर ३२७
कामठी १२४२
काटोल ४६८
कुही १६८
मौदा ३५०
नागपूर ग्रामीण ३,७३९
नरखेड २५६
पारशिवनी २२६
रामटेक २७०
सावनेर ७५७
उमरेड ३९९
यूआरसी १ ११,९१४
यूआरसी २ १६१०
यूआरसी ३ २८९
यूआरसी ४ २५२
यूआरसी ५ ३९६
- आता लॉटरीकडे लक्ष
आरटीईची संपूर्ण प्रक्रिया संपलेली आहे. आता फक्त लॉटरीची प्रतीक्षा पालकांना आहे. लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित केले जातील. पुणे येथून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकाच वेळी सर्व जागांवर लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे राऊंड सुरू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात लॉटरी प्रक्रिया होणार असल्याची शक्यता आहे.
- पूर्वी ही प्रक्रिया महिनाभरापेक्षा जास्त चालायची. यावर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी कमी कालावधी मिळाला. त्यातही तक्रारी यावेळी कमी झाल्या. लोकेशनमध्ये सुधारणा केली होती. सर्व्हरच्या अडचणी जाणवल्या नाही. सुरुवातीला ओटीपीच्या तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे आठवडाभरासाठी मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंतची प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. यापुढचीही प्रक्रिया सुरळीतच पार पडेल.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक