नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग चालू आर्थिक वर्षांत नागपूर जिल्ह्यात धडक मोहीम राबवित आहे. शहरासह प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या विभागाच्या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे. ४६३ केसेसमध्ये जप्त केलेली ६० लाखांची दारू बेवारस होती, तर एप्रिल ते डिसेंबर या काळात २१३४ आरोपींना अटक केली.
वर्षभरात २.४२ कोटींची दारू जप्त
१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांत २ कोटी ४२ लाख ८५ हजार ६०४ रुपये किमतीचा मुद्देमाल (दारू, वाहने) जप्त केला.
६० लाखांची दारू बेवारस
माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू उत्पादक आणि विक्रेते माल सोडून पळून जातात. या मालावर दावा करणारे पुढे येत नाही. त्यामुळे या मालाला बेवारस समजले जाते. कारवाईत जवळपास ६० लाख रुपयांची बेवारस दारू जप्त केल्याची माहिती आहे.
३३०३ केसेस; २७८० जणांना ठोकल्या बेड्या
नागपूर जिल्ह्यात निरीक्षक-ए विभाग ते निरीक्षक-एफ असे एकूण सहा विभाग, दोन भरारी पथके आणि रामटेक चेक पोस्ट अशा एकूण नऊ ठिकाणी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात ३३०५ केसेस करण्यात आल्या. त्यात २७०६ क्लेम आणि ५९९ अनक्लेम दाव्यांची नोंद आहे. या केसेसमध्ये २७८० जणांना अटक करून ५६ वाहने जप्त केली. वर्षभरातील या कारवाईत अधिकाऱ्यांनी ३ कोटी १२ लाख ७६ हजार १६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात सर्वाधिक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोव्हेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात ३०१ केसेस केल्या. त्यात २७५ आरोपींना अटक आणि चार वाहने जप्त केली. या केसेसमध्ये ४२ लाख ९३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सहा विभागासह दोन भरारी पथके आणि रामटेक चेक पोस्टवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. भरारी पथक-१ ने ७० लाख आणि पथक-२ ने ४३.९३ लाख तसेच चेक पोस्टवर ४३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूर जिल्ह्यात विभागातर्फे अवैध दारू विक्रेत्यांवर धडक मोहीम वारंवार राबविण्यात येते. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात येते.
- सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर जिल्हा.