सुमेध वाघमारे
नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन योजना आखून त्यावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे, असे असतानाही मृत्यूदर रोखण्यात हवे तसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता तर कोरोनाच्या नावाखाली या योजनांनाच ग्रहण लागल्याने पूर्व विदर्भात शिशू मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.
शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ रुग्णवाहिकेची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा व मानव विकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो. त्यानंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.
-योजनेतील मनुष्यबळ कोरोना प्रतिबंधाच्या कार्यात
आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी असलेल्या योजनांमधील काही डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची ड्युटी ‘कोविड केअर सेंटर, ‘कोविड हेल्थ सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र व ‘ट्रेसिंग’च्या कार्यात लावली आहे. यामुळे प्रभावीपणे योजना राबविणे शक्य नाही.
-कमी न होता, पाच वर्षांत वाढले शिशू मृत्यू
२०१४-१५मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात २०६६ शिशूमृत्यूंची नोंद होती. यात भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्ह्यात १७४ मृत्यू होते. परंतु, मागील पाच वर्षांत ही संख्या कमी न होता उलट वाढली. २०२०-२१ मध्ये २४२६ मृत्यूची नोंद झाली. यात भंडाऱ्यात २३७, गोंदियात २८८, चंद्रपूरमध्ये ४७४, गडचिरोलीत ३७६, वर्धेत १६५ तर नागपूर जिल्ह्यात नागपूर ८८६ मृत्यू झाले.
-२०२०-२१ या वर्षात शून्य ते एक या वयोगटातील मृत्यू
जिल्हा : मृत्यू
नागपूर : ८८६
भंडारा : २३७
चंद्रपूर : ४७४
गडचिरोली : ३७६
गोंदिया : २८८
वर्धा : १६५
- हा ‘सिस्टम’चा दोष
श्रीलंका व बांगलादेशाच्या तुलनेत भारताचा बालमृत्यूदर अधिक आहे. केरळचा तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर जास्त आहे. याचा अभ्यास करणाऱ्या व उपाययोजना करणाऱ्या सिस्टमचा हा दोष आहे. बालमृत्यू रोखणे हा खर्चीक कार्यक्रम नाही. ‘सिस्टम’ने योग्य पद्धतीने काम केल्यास व आजाराच्या लक्षणांची व उपाययोजनांची घराघरात माहिती पोहोचविल्यास मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य आहे.
-डॉ. सतीश देवपुजारी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ