लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झाला नाही. सध्या ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा जोर वाढला आहे. आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. अशात ग्रामीण आरोग्याची स्थिती बिकट झाली असून, प्रशासन हतबल झाले आहे.वर्षभरापूर्वी शासनाने केंद्रीय पद्धतीने औषधांच्या खरेदीसाठी स्थापन केलेल्या हाफकीन महामंडळाचा गाडा अद्यापही रुळावर न आल्याने औषधांची कोट्यवधीची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना औषध कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नागपूर जिल्ह्यात गावागावात साथीचा आजाराचा उद्रेक झाला आहे. डेंग्यू, स्क्रब टायफस, मलेरियासारखे आजाराचे रुग्ण दररोज वाढत आहे. स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराने नागपूर जिल्ह्यातील २१ जण बाधित झाले असून, यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याची परिस्थिती बिकट झाली असताना, जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे संचालित ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधांचा तुटवडा कमालीचा भेडसावत आहे. मे महिन्यापासून औषधांसाठी जिल्हा परिषदेने अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा केले आहे. अजूनही औषधांचा पुरवठा जिल्हा परिषदेला झालेला नाही. आज ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत आहे. जिल्हा परिषदेची आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद अत्यल्प आहे. जिल्हा परिषदेचा औषधांचा राखीव साठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी मान्य केले आहे. सवई यांनी औषधांसाठी दोन वेळा हाफकिनच्या संचालकांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीतसुद्धा हा विषय त्यांनी मांडला. पालकमंत्र्यांनीही हाफकिनच्या संचालकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. परंतु औषधांचा पुरवठा झाला नाही. औषधांचा साठा संपत असल्याने प्रशासन, अधिकारी हतबल आहेत. सध्या उद्भवलेल्या साथीच्या आजाराच्या औषधींच्या पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडे उपकर अनुदानाचे पाच लाख रुपये आहे. या अनुदानातून आम्ही जि.प.च्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२०० रुपये प्रमाणे वाटप केले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार त्यातून खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.डॉ. योगेंद्र सवई, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.
अडीच कोटी हाफकिनच्या खात्यात, औषधींचा पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:28 PM
शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झाला नाही. सध्या ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा जोर वाढला आहे. आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. अशात ग्रामीण आरोग्याची स्थिती बिकट झाली असून, प्रशासन हतबल झाले आहे.
ठळक मुद्देग्रामीण आरोग्य केंद्राची अवस्था : आरोग्य यंत्रणा हतबल