नागपूर : सैन्य छावणी परिषद क्षेत्रातील राज्य मार्गावरून जाताना सर्वसामान्य वाहनचालकांना तसेच सैन्य अधिकाऱ्यांना फार त्रास सहन करावा लागतो.यावर कायमचा तोडगा म्हणून कामठी कॅन्ट बायपास मार्गाचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. कामठी-नागपूर मार्गावरील आशा हॉस्पिटल ते वारेगावला जोडणाऱ्या अडीच कि.मी. बायपास मार्गाचा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाने मंजूर केला असून त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या दोन महिन्यांत मार्गाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कामठी येथील सैन्य छावणी परिषद क्षेत्रातील प्रश्नांवर परिषदेचे अध्यक्ष जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर धरमवीर सिंग यांच्या कार्यालयात सोमवारी आढावा बैठक पार पडली. त्यात पालकमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली. या बैठकीत ब्रिगेडियर धरमवीर सिंग यांच्यासह उपजिल्हाधिकारी (महसूल) सुभाष चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प)चे कार्यकारी अभियंता एच.आर. भानुसे, अभियंता अल्पना पाटणे, कनिष्ठ अभियंता प्रकाश नाईक, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अभियंता स्नेहल सुटे, महावितरणचे अभियंता दिलीप मदने, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, सैन्य छावणी परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश स्वामी उपस्थित होते. छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष गोपाल यादव, सदस्या सीमा यादव, विजयालक्ष्मी राव आदींनी या क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या. ब्रिगेडियर धरमवीर सिंग यांनी सैन्य छावणी परिषद क्षेत्र संरक्षित क्षेत्र असल्याने येथील नियमांचे पालन करून सैन्य प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत सैन्य छावणी भागात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासह भाजीमंडी पूल ते गन चौक दरम्यानचा दोन किमी मार्ग मॉर्निंग वॉकसाठी उपलब्ध करून देणे, गण चौकातील बागेत १० लक्ष रुपयांच्या निधीतून खुले व्यायामगृह उभारणे, येरखेडा-रनाळा या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक परवानगी घेऊन सर्वेक्षणाचे काम सुरू करणे, महादेव घाट येथील योगाभ्यासी केंद्रासाठी विस्तारीत कक्षाची निर्मिती करणे, सैन्य छावणी भागातील नागरिकांना महावितरणद्वारे वीज पुरवठा देऊन संपूर्ण वीज जोडणे, भूमिगत करणे, ईदगाहसाठी जागा मंजुरी देणे आणि रब्बानी फुटबॉल ग्राऊंड खेळण्यासाठी उपलब्ध करून देणे आदी निर्णय घेण्यात आले.
कामठी कॅन्ट बायपास मार्गासाठी साडेपाच कोटी
By admin | Published: September 29, 2015 4:28 AM