लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने लासलगाव (जि, नाशिक) येथील श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष तसेच नागपूर विभागीय व्यवस्थापकाला अटक केली. सतीश पोपटराव काळे (अध्यक्ष) आणि नितीन दिनकराव खाडे (विभागीय व्यवस्थापक), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा ११ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला आहे.श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने १४ ऑगस्ट २०१६ ला येथील सीताबर्डी परिसरात संस्थेची शाखा सुरू केली होती. अल्पावधीत दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून सोसायटीचे एजंट गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते. संचालक मंडळांकडून मिळत असलेल्या भूलथापांना बळी पडून अनेक गुंतवणूकदारांनी या सोसायटीत आपली लाखोंची रोकड गुंतविली; मात्र नमूद मुदतीनंतर त्यांना परतावे मिळाले नाही. संस्थाचालकांनी येथून गाशा गुंडाळल्याने काही महिन्यांपूर्वी पीडित गुंतवणूकदारांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रारीत ५० लाख १६ हजार ४११ रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. फसवणुकीच्या रकमेचा आकडा बघता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे सोपविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सुहास घोडके यांनी त्याचा तपास करून तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या माहितीवरून सोसायटीच्या संचालक मंडळाने २ कोटी ४४ लाख ७३ हजार २४५ रुपयांचा अपहार केल्याचा निष्कर्ष काढला. त्यावरून ३० जानेवारी २०१९ ला गुन्हे शाखेच्या पथकाने संस्थेचा विभागीय व्यवस्थापक नितीन दिनकरराव खाडे याला अटक केली. संस्थेचा अध्यक्ष सतीश पोपटराव काळे (रा. लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक) याला अफरातफरीच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तो कारागृहात बंदिस्त होता. त्याला स्थानिक पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ७ फेब्रुवारीला ताब्यात घेतले. आरोपी खाडे आणि काळे या दोघांना विशेष न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.नोकरीच्या नावाखालीही रक्कम हडपलीआरोपींनी नुसती गुंतवणुकीच्या नावाखालीच नव्हे तर नोकरीच्या नावाखालीही रक्कम हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थेत नवीन नोकरभरती करायची आहे, असे सांगून बेरोजगारांना मुलाखतीला बोलवत असे. मुलाखतीला आलेल्या बेरोजगारांना आरोपी नितीन खाडे एक लाख रुपयांची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून मागत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेक बेरोजगारांकडूनही लाखो रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले आहे.