योगेश पांडे ल्ल नागपूर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने राज्यात ‘शतकोटी’ वृक्ष लागवडीची मोहीम २०११ मध्ये जाहीर करण्यात आला होती. मात्र, योग्य नियोजनाअभावी या योजनेचा बोजवारा उडाला आहे. १०० कोटींच्या या योजनेत केवळ एक चतुर्थांश म्हणजेच सुमारे २५ कोटी वृक्षांची लागवड करण्यातच वन विभागाला यश आले. २५ कोटी झाडे लावण्यासाठी सव्वाचारशे कोटींहून अधिक खर्च आला. यातील किती झाडे जगली याची माहिती देण्यास मात्र विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. आॅक्टोबर २०११ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारकडून ‘शतकोटी’ वृक्ष लागवड योजनेची घोषणा करण्यात आली होती. वन विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१२ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत संपूर्ण राज्यात २५ कोटी ३९ लाख झाडे लावण्यात आली. यासाठी वन विभागाने ४२७.५६ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. सरासरी प्रत्येक झाडामागे जवळपास १७ रुपयांचा खर्च आला. ‘शतकोटी’ योजनेअंतर्गत लावलेल्या २५ कोटींहून अधिक झाडांपैकी नेमकी किती झाडे जगली, तसेच एकूण तरतुदीपैकी किती निधीचा उपयोग झाला याबाबतदेखील विचारणा केली होती. या बाबींची नोंद ठेवण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘एमआयएस’ (मॅनेजमेन्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम) विकसित करण्यात आली होती. परंतु तरीदेखील आकडेवारी देण्यास मात्र वन विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीच्या खर्चात घट ‘शतकोटी’ वृक्ष लागवड योजनेचे उद्दीष्ट गाठण्यात यश आले नसले तरी प्रति वृक्ष लागवडीचा खर्च कमी करण्यात मात्र नक्कीच राज्य शासनाला यश आले आहे. २०१२-१३ मध्ये एका झाड लावण्याचा खर्च १९ रुपये होता. तो खर्च २०१५-१६ मध्ये १० रुपयांवर आला. एक झाड लावण्यासाठी २०१३-१४ मध्ये २० तर २०१४-१५ मध्ये १७ रुपये खर्च आला होता.
‘शतकोटी’ योजनेची २५ कोटींतच दमछाक
By admin | Published: October 04, 2016 6:15 AM