नागपूर : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यूने इतरही शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूचा आकडांचा खेळ सुरू झाला आहे. नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्येही मागील २४ तासांत २४ मृत्यूने बुधवारी लक्ष वेधले. परंतु या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता हा सामान्य आकडा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेयो, मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रदेशातून रुग्ण येतात. या दोन्ही रुग्णालयाची रोजची ओपीडी तीन ते चार हजारांच्या घरात असते. तर आंतररुग्ण विभागात रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. मागील ४० वर्षांत दोन्ही रुग्णालयातील रुग्णांची संख्या चार पटीने वाढल्या असल्यातरी मनुष्यबळापासून ते सोयी उपलब्ध करून देण्याकडे सरकारचे फारसे लक्ष नाही. या दोन्ही रुग्णालयाला हाफकिन महामंडळाकडून दोन वर्षांपासून औषधी मिळालेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करून रोजचा दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. मेयोमध्ये तर स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्यात आलेली ३० टक्क्यांची मर्यादाही संपली आहे. यामुळे औषधांचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. असेच मेडिकल प्रशासनाचे आहे. औषधांचा तुटवड्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचा रोषाला डॉक्टरांना समोर जावे लागत आहे.
- मेडिकलमध्ये १५ मृत्यू
मागील २४ तासांत मेडिकलमध्ये १५ मृत्यू झाले. तर ४८ तासांत ३१ मृत्यूची नोंद आहे. यात तीन लहान मुले असल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले. ते म्हणाले, रुग्णालयात रोज जवळपास १० ते १५ मृत्यू होतात. या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे, यातील ८० टक्के रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून रेफर होऊन आलेले असतात. हे सर्व रुग्ण अति गंभीर, आजाराची गुंतागुंत वाढलेली असल्याने उपचारादरम्यान मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो.
- मेयोमध्ये ९ मृत्यू
मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. राधा मुंजे यांनी सांगितले, मागील २४ तासांत ९ मृत्यू झाले आहेत. यात लहान मुले नाहीत. मेयोमध्ये रोज सहा ते आठ मृत्यू होतात. ही संख्या सामान्य असल्याचे त्या म्हणाल्या.