नागपूर : जिल्ह्यातील मानसिंहदेव अभयारण्यालगतच्या रिसाल वनक्षेत्राला बुधवारी मोठी आग लागली. यात २५ हेक्टरपेक्षा अधिक जंगल जळाले. मात्र वनकर्मचारी आणि वनमजुरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे लागूनच असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या वनक्षेत्रापर्यंत आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, रिसाल वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या अधिकारक्षेत्रात येते. बुधवारी दुपारी ३.३० वाजता प्रादेशिक वनक्षेत्रामधील वनकर्मचाऱ्यांना एफडीसीएमच्या रिसाल क्षेत्रामधून धुराचे लोट निघताना दिसले. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच खापा आरएफओ पी.एन. नाईक यांना देण्यात आली. नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. टँकरमधून आणलेले पाणी, झाडाच्या फांद्या यांचा वापर करून वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविणे सुरू केले. ही आग आटोक्यात आली असली तरी धुमसतच होती. गुरुवारी सकाळी पुन्हा काही भागात आग पसरलेली दिसली. त्यानंतर पुन्हा आग विझविण्याचे काम तातडीने करण्यात आले.
...
वनकर्मचारी तत्परतेने लागले कामी
आरएफओ नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आगीची माहिती मिळताच आग विझविणे सुरू केले. वनकर्मचारी तत्परतेने कामी लागले, त्यामुळेच हे शक्य झाले. विलंब झाला असता तर खापा वनक्षेत्र (प्रादेशिक) आणि मानसिंहदेव अभयारण्य (वन्यजीव) वनक्षेत्राचे जंगलही आगीच्या भक्षस्थानी सापडले असते.
...