लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल/हिंगणा : काेराेना संक्रमण वाढत असताना प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. शनिवारी (दि. २०) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काटाेल तालुक्यात २५ तर हिंगणा तालुक्यात ११ नवीन रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. काेराेनाची ही वाढती साखळी ताेडण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व इतरांची काळजी घेत उपाययाेजनांचे पालन करणे गरजेचे आहे.
काटाेल तालुक्यातील २५ नवीन काेराेना संक्रमित रुग्णांमध्ये १३ रुग्ण काटाेल शहरातील असून, १२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यात काटाेल शहरातील तारबाजार येथील सहा, ठोमा ले-आऊट लक्ष्मीनगरातील प्रत्येकी दाेन, धंतोली, आययूडीपी व दोडकीपुरा येथील प्रत्येकी एक रुग्ण, तालुक्यातील येनवा येथील पाच, कचारीसावंगा येथील चार तर काेंढाळी येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यातही ११ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात वानाडोंगरी येथील सात, रायपूर येथील दाेन आणि वडधामना व टाकळघाट प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात काेराेनाचे आजवर एकूण ४,०५६ रुग्ण आढळून आले असून, यातील ३,९९२ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, १०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाढत्या संक्रमणामुळे प्रशासनाने आता शालेय विद्यार्थ्यांचीही काेराेना टेस्ट करायला सुरुवात केली आहे.