लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अक्षयतृतीयाच्या दिवशी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या दोन व्यक्तींजवळून २५.३ लाख रुपयाचे सोने पकडण्यात आले. यासोबतच या दोघांना मुंबईच्या विमानाचे तिकीट उपलब्ध करण्यासाठी आलेल्या नागपुरातील एका युवकालाही पकडण्यात आले.मंगळवारी पहाटे ४.१० वाजता एअर अरेबियाच्या जी ९-४१६ या क्रमांकाच्या शारजाह-नागपूर विमानातून ठाणे आणि तिरुनेलवल्ली येथील रहिवासी असलेले युवक नागपूरच्या विमानतळावर उतरले. पहिल्या युवकाच्या शरीरात पेस्ट फार्म स्वरुपात ४५५ ग्राम सोने किंमत (१३.२ लाख रुपये) आणि दुसऱ्या युवकाच्या शरीरातही पेस्ट फॉर्म स्वरुपात ३८० ग्राम (१२.१ लाख रुपये किमतीचे) सोने सपडले. संशयाच्या आधारावर कस्टम विभागाने अगोदर ठाण्यातील ३८ वर्षीय युवकाला पकडून त्याची विचारपूस केली. यादरम्यान त्याच्यासोबत दुसरा एक साथीदार असल्याचेही समजले. नंतर त्यालाही पकडण्यात आले. दुसऱ्या युवकाची कसून चौकशी केली असता त्यांनी नागपुरातील एक तरुण त्यांना मुंबईचे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळावरच असल्याचे सांगितले. तिकीट घेऊन बाहेर असलेल्या या युवकाला पकडले जाण्याची शंका येताच तो पळू लागला. यानंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला धावून पकडले. त्यांच्यावर शंका असल्याने विशेष परवानगी घेऊन दोन्ही युवकांचा एक्सरे करण्यात आला. यात त्यांच्या शरीराच्या आत पेस्ट फॉर्म स्वरुपात सोने असल्याचे आढळून आले. कारवाई सुरु असल्यामुळे एअरपोर्ट कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी पकडलेल्या युवकांची नावे जाहीर केलेली नाही.जप्ती किंवा दंडच होणारविशेष म्हणजे बाहेरून सोने पावतीसह खरेदी करून आणता येऊ शकते. यासाठी विमानतळावर ठराविक कस्टम ड्युटी अदा करावी लागते. ड्युटीची चोरी करून अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने नेहमीच सोन्याची अशाप्रकारे तस्करी केली जाते. अनेकजण सोने लपवून आणतात. परंतु ताज्या घटनेत मात्र अतिशय सुनियोजित पद्धतीने २० लाखापेक्षा कमी सोन्याची जप्ती दाखवण्यासाठी दोघांनी वेगवेगळ्या प्रमाणात एक किलोपेक्षा थोडे कमी सोने ठेवले. अधिकारिक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नियमाप्रमाणे २० लाख रुपयापेक्षा कमी किमतीचे सोन्याच्या अवैध वाहतुकीवर केवळ पेनाल्टी (दंड) लवण्यात येतो. २० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक सोने असल्यास अटक तर केली जाते परंतु जामीनही मिळून जातो. एक कोटी रुपये कंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने अवैधपणे आणले असेल तरच अटकेनंतर जामीन मिळत नाही. तेव्हा कमी सोने असूनही ते शरीराच्या आत लपवून आणण्याचा धोका या युवकांनी का पत्करला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.तपासाच्या नावावर अनेकांना त्रासशारजाह व दोहा येथून नागपूरला येणारे विमान पहाटे ४.१० व ४.२५ वाजता येते. या विमानाने येणाऱ्या प्रवाशांना तपासाच्या नावावर येथे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अलीकडेच एका प्रवाशाकडून ड्युटीच्या नावावर ६५ हजार रुपये वसुलण्यात आले. याचप्रकारे केवळ २२ रुपयाच्या आर्टिफिशियल ज्वेलरीला सोन्याचे दागिने सांगून त्याची किंमत २ लाख ३४ हजार ५९१ इतकी सांगण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्या पूर्ण कुटुंबाला तीन तास विमानतळावर रोखून धरण्यात आले होते. यानंतर प्रवासी नसरुद्दीन कुरैशी यांना २९ नोव्हेंबरपर्यंत त्रास सहन करावा लागला होता. अखेर तपासानंतर ती ज्वेलरी सोन्याची नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी सोने तपासण्यास बोलावण्यात आलेल्या तज्ज्ञाचे शुल्क देण्याची मागणी केली. लोकमतने हे प्रकरण उघडकीस आणले तेव्हा कुठे प्रवाशांकडून कुठलेही शुल्क वसुलण्यात आले नाही.अधिकाऱ्यांनी साधले मौनमंगळवारी दोन तरुणांजवळून पकडण्यात आलेल्या सोने प्रकरणाबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही फोन उचलला नाही. मॅसेजचेही उत्तर देण्यात आले नाही. कारवाईबाबतची गोपनीय बाजू सोडून इतर माहिती स्पष्ट केली जाऊ शकते, परंतु संबंधित अधिकारी काही बोलायलाच तयार नसून त्यांनी साधलेल्या मौनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत सांगितले, त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही संपर्क साधला नाही.