लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावनेर तालुक्यातील सिरोंजी चेक पोस्टवर सोमवारी निवडणूक विभागाच्या पथकाने २५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. मध्य प्रदेशातून ही रक्कम महाराष्ट्रात आणली जात होती.सिरोंजी पोस्टवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाला सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशच्या सौंसर मार्गाने मोटरसायकल क्रमांक एमपी २८-एनएच ०१६५ यावर चालक राहुल रामराव ढवळे (२६) आणि गाडीमागे बसलेला गणपत रामाजी कोडापे (२७) दोघेही रा. बेरडी. ता. सौंसर जिल्हा छिंदवाडा हे संशयास्पद स्थितीत येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी गाडी वेगाने पुढे घेतली. यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत सिरोंजी गावाकडे जाण्याच्या मार्गात पकडले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता मागे बसलेल्या गणपत कोडापे याच्याजवळील पिशवीत ५०० रुपयांच्या ५ हजार नोटा अशी एकूण २५ लाख रुपयांची रक्कम आढळली. पथकाने ही रक्कम ताब्यात घेत तहसील कार्यालय व खापा पोलिसांना कळविले.सिरोंजी पोस्टवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी फणिंद्र साबळे, सहायक ग्रामसेवक देवेंद्र जुवारे, ग्रामसेवक गजानन शेंबेकर, पोलीस शिपाई प्रकाश ठोके आणि नीलेश अंबरते कार्यरत आहेत. या पथकाने आरोपीसह रक्कम तहसील कार्यालयात आणली. यानंतर ही रक्कम जिल्हा उपकोषागारात जमा करण्यात आली. तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार सतीश मसाळ, न.प. मुख्याधिकारी हरिचंद्र टाकळखेडे यावेळी उपस्थित होेते. ही रक्कम कुणाची आहे आणि कुठे नेली जात होती, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या सिरोंजी पोस्टवर २५ लाख पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:37 PM
रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावनेर तालुक्यातील सिरोंजी चेक पोस्टवर सोमवारी निवडणूक विभागाच्या पथकाने २५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. मध्य प्रदेशातून ही रक्कम महाराष्ट्रात आणली जात होती.
ठळक मुद्देमध्य प्रदेशातून मोटरसायकलने आणली जात होती रक्कम : आरोपीचा पळण्याचा प्रयत्न