लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण प्रचंड वाढल्याने शहरातील हॉस्टिलमध्ये बेड शिल्लक नाहीत. शहरात ८९४ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. परंतु दररोज ४ ते ५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकांसाठी धावाधाव करावी लागत आहे. याचा विचार करता, महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २५ बसेस ‘आपली बस रुग्णवाहिका’ म्हणून सेवेत सोमवारी दाखल झाल्या आहेत.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यावेळी नगरसेवक बंटी कुकडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. बसच्या कंडक्टरना रुग्णांना ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती तिवारी यांनी यावेळी दिली.
शहरातील गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने, परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी बसमध्ये ऑक्सिजन व अन्य आवश्यक सुविधा निर्माण कराव्या लागतील. शहरात ६५ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना थोडा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या दहा झोनला प्रत्येकी दोन बसेस उपलब्ध केल्या जातील. या बसेसचे नियंत्रण परिवहन विभागाकडे राहणार आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांना डेडिकेट कोविड केअर सेंटरवर पोहोचविणे, रुग्णालयात दाखल करणे, यासाठी या बसेसचा वापर केला जाईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट महिन्यात सहा बसेसचा ‘आपली बस रुग्णवाहिका’ म्हणून वापर करण्यात आला होता. यासाठी या बसमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या.
...
लोकार्पणाचा थाट कशासाठी?
रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने मनपा प्रशासनाने २५ बसेस आपली बस रुग्णवाहिका म्हणून सेवेत आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या बसेस सेवेत दाखल झाल्या. कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असतानाही मनपा पदाधिकाऱ्यांना या बसचे लोकार्पण करण्याचा मोह आवरला नाही. त्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची काही गरज नव्हती, अशी नागरिकांत चर्चा आहे.