राजीव सिंग
नागपूर : आपली बस पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालविण्याचा निर्धार केला आहे. वर्षअखेरीस २३० इलेक्ट्रिक बसेस महापालिकेच्या ताफ्यात सामील होतील. त्यासाठी कसेतरी चार्जिंग स्टेशन बनवले आहे. परंतु, राज्य सरकारने मंजूर केलेल्या १३७ कोटी रुपयांमधून खरेदी केल्या जाणाऱ्या २५० इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मनपाला अद्याप जागा मिळालेली नाही. सध्या वाहतूक सल्लागाराची प्रक्रिया सुरू आहे. चार्जिंगची व्यवस्था वेळेवर न केल्यास मिळणाऱ्या बसेस येऊन उभ्या राहण्याची शक्यता आहे.
सध्या इलेक्ट्रा आणि तेजस्विनीच्या ४६ इलेक्ट्रिक बसेस आणि स्मार्ट सिटीकडून मिळालेल्या ४० एसी इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. शहरात एकूण ८६ इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. तर पीएमआयकडून १० इलेक्ट्रिक बसेस प्राप्त झाल्या आहेत. आरटीओमध्ये नोंदणी करणे बाकी असले तरी लकडगंजमध्ये तात्पुरते पाच चार्जिंग पॉइंट उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाने दिली.
वाडीतील इलेक्ट्राच्या ४६ बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने ४.४० कोटी रूपये खर्च केले. तेथे वीज पुरवठ्यासाठी ३.७५ किमी लांबीची भूमिगत हायटेंशन लाइन टाकण्यात आली आहे. दुसरीकडे हिंगणा येथे चार्जिंग स्टेशन बांधण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. दरम्यान, पीएमआयच्या १४४ इलेक्ट्रिक बसेसच्या पार्किंगसाठी वाठोडा येथील नासुप्रकडून १० एकर जागा घेण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आराखडा मंजुरीसाठी नासुप्रकडे सादर करण्यात आला आहे. सध्या तेथे सुरक्षा भिंत बांधली जात आहे. स्थानकाचे काम कधी पूर्ण होणार यावर महापालिका परिवहन विभाग काहीही बोलण्यास तयार नाही. वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाठोडा येथील चार्जिंग स्टेशनच्या जागेवर सुरक्षा भिंत बांधली जात आहे. निर्धारित कालावधीत कामे पूर्ण होतील. वर्षअखेरीस १४४ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दोन जागांवर नजर
नवीन २५० इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी जागा अद्याप ठरलेली नाही. असे असले तरी परिवहन विभागाचे अधिकारी प्राथमिक स्तरावर दोन ठिकाणच्या जागावर चर्चा करीत आहेत. यामध्ये वाठोडा येथील प्रस्तावित चार्जिंग स्टेशनला लागून असलेल्या भागात आणखी १० एकर जागा रिकामी आहे. तसेच मिहानमधील ३ एकर जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आहे. तेथे कोणतेही काम झालेले नाही. मात्र, अद्याप चार्जिंग स्टेशनसाठी कोणतीही जागा निश्चित झालेली नाही.
येथे आहे चार्जिंगची व्यवस्था
- वाडी स्थानकावर इलेक्ट्राच्या ४६ इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग केले जात आहे.
हिंगणा स्थानकावर स्मार्ट सिटीच्या ४० एसी इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग करण्यात येत आहेत.
पीएमआयकडून मिळणाऱ्या १४४ बसेससाठी वाठोडा येथे स्थानक प्रस्तावित आहे.