नागपूर : जळगांवमधील एका सराफा व्यापाऱ्याचे २५० ग्राम सोने घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने धावत्या रेल्वेगाडीत सिनेस्टाईल जेरबंद केले. अमिरूल हसन शेख (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी शेख हा जळगाव मधील वर्मा नामक सराफा व्यापाऱ्याकडे काम करतो. त्याने संधी साधून सुमारे २५० ग्राम सोने लंपास केले आणि तो १२८०९ मुंबई-हावडा मेलने निघाला. ही माहिती जळगाव पोलिसांनी ठिकठिकाणच्या पोलिसांना तसेच रेल्वे सुरक्षा दलाला दिली. त्यावरून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांना कंट्रोल रूमकडून मिळाली. त्यांनी तातडीने आरोपीच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरपीएफच्या क्राईम ब्रांचचे निरीक्षक नंदबहादुर क्राइम ब्रांच गोंदियाच निरीक्षक अनिल पाटिल, आरपीएफ गोंदियाचे उप निरीक्षक टेंभुर्णीकर आणि त्यांचे सहकारी आरोपीला पकडण्यासाठी कामी लागले. ही गाडी आज तुमसर रोड स्थानकावर पोहचताच कोच नंबर १ मध्ये बसलेल्या अमिरूल हसन शेखला आरपीएफच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये ९८ ग्राम सोन्याचे दागिने सापडले. त्याची किंमत ६.४५ लाख असल्याचे समजते. दरम्यान, कारवाईनंतर ही माहिती जळगाव पोलिसांना देण्यात आली. त्यांचे पथक येथे पोहचल्यानंतर आरोपीला त्यांच्या स्वाधिन केले जाणार आहे.