नागपूर : काही दिवसांत तीन हजारांखाली गेलेल्या चाचण्यांमध्ये शुक्रवारी वाढ झाली. ५०११ चाचण्यांची भर पडली. यात २५० रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकूण १० लाख २६ हजार २५४ चाचण्या झाल्या. यातून १ लाख ३१ हजार ७९० रुग्ण बाधित आढळून आले. चाचण्यांच्या तुलनेत १२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४११४
झाली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण चाचण्यांमध्ये शहरात ७ लाख ८१ हजार ४०४, तर ग्रामीणमध्ये २ लाख ४४ हजार ८५० चाचण्या झाल्या. यात शहरात रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या २ लाख २६ हजार ८३१ असून, ग्रामीणमध्ये १ लाख ४९ हजार ४५६ झाली आहे, शिवाय शहरात ५ लाख ५४ हजार ५७३, तर ग्रामीणमध्ये ९५ हजार ३९४ आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या आहेत. सध्या चाचण्यांची संख्या वाढली असली तरी रुग्णांची संख्या कमी असल्याने दिलासादायक चित्र आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १७५, ग्रामीणमधील ७२, तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील तीन, ग्रामीणमधील दोन, तर जिल्हाबाहेरील तीन मृत्यू आहेत. सध्या ३६४१ कोरोनाचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यातील शहरातील २६४१, तर ग्रामीणमधील १००० आहेत. ९८७ रुग्ण रुग्णालयात, तर २६५४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-मेयोवर कोरोनाबाधितांचा ताण
मेडिकलमध्ये फायर ऑडिट होणार असल्याने येथील कोरोनाचे रुग्ण मेयोमध्ये स्थानांतरित करण्याचे खुद्द जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले आहेत. परिणामी मेयोवर कोरोनाबाधितांचा ताण वाढला आहे. इतर दिवशी मेयोमध्ये कोरोनाचे आठ ते दहा रुग्ण भरती व्हायचे तिथे शुक्रवारी २५ रुग्ण भरती झाले. मेडिकलच्या तुलनेत मेयोमध्ये डॉक्टरांपासून ते पॅरामेडिकल स्टाफ कमी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
- दैनिक संशयित : ५०११
- बाधित रुग्ण : १३१७९०
- बरे झालेले : १२४०३५
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३६४१
- मृत्यू : ४११४