नागपूर : ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. परंतु एसटीच्या बसेसच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कसे जायचे, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने नव्या वर्षात १ जानेवारीपासून विद्यार्थ्यांसाठी २५० फेऱ्या सुरू करण्याची तयारी केली आहे.
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. परंतु कोरोनामुळे एसटीने अद्याप विद्यार्थ्यांसाठी बसेस सुरू केल्या नव्हत्या. नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कसे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी वाहनांनी शाळेत जाणे विद्यार्थ्यांना परवडत नाही. एसटी महामंडळाच्या आगारातून संबंधित विद्यार्थी पास घेऊन शाळेत ये-जा करतात. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी एकूण ६५३ फेऱ्या चालविण्यात येतात. १५ दिवसांपूर्वी १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार एक जानेवारीपासून विद्यार्थ्यांसाठी २५० नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मानव विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींसाठी काटोल तालुक्यात ७ आणि रामटेक तालुक्यात ७ बसेस चालविण्यात येतात. परंतु सध्या या बसेस सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
...............
विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करून देणार
ग्रामीण भागात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. शेकडो विद्यार्थी एसटी बसनेच शाळेत जातात. त्यांच्या सुविधेसाठी एसटीने १ जानेवारीपासून २५० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळांकडून मागणी झाल्यास आणखी बसफेऱ्या सुरू करण्यात येतील.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग