लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी शिकत असलेल्याच शाळा केंद्र राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ६९१ मुख्य केंद्र राहणार असून, १,७९३ उपकेंद्र राहणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी ४७४ मुख्य केंद्र व ९३८ उपकेंद्र राहणार आहेत. विशेष म्हणजे अजूनही विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
यावर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, एका बाकावर १ विद्यार्थ्याचे नियोजन केले आहे. एका वर्गात २५ ते ३० च्या आत विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी केंद्राची संख्या वाढविण्याची गरज असल्याने नागपूर बोर्डाने त्यासंदर्भात नियोजन केले आहे. दहावीसाठी ६९१ व बारावीसाठी ४७४ मुख्य केंद्र असणार आहेत. याला उपकेंद्र जोडण्यात आले आहे. परीक्षेचे साहित्य या केंद्रावरून वितरित करण्यात येणार आहे. केंद्र वाढविल्याने परीक्षेच्या आयोजनात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेत २० हजाराच्या जवळपास तर बारावीच्या परीक्षेत १७ हजाराच्या जवळपास कर्मचारी कार्यरत होते. यावर्षी यात १० टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसंदर्भातील प्रस्ताव मंडळाने बोर्डाला पाठविले आहे.
या शाळेला केंद्र नाही
ज्या शाळेतील दहावी आणि बारावीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ पेक्षा कमी आहे, अशा शाळांना केंद्र देण्यात आले नाही. नागपूर बोर्डाने २२४ दहावीच्या व बारावीच्या ९४ शाळांची यादी तयार केली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळचेच केंद्र मिळणार आहे.
नागपूर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्राचे नियोजन केले आहे. पण या केंद्रावर त्याच शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून राहतील का? याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून काहीच सूचना आल्या नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन काटेकोर सुरू आहे. राज्य मंडळाकडून आलेल्या सूचनांचे पालन आम्ही करीत आहोत.
माधुरी सावरकर, विभागीय सचिव, नागपूर बोर्ड