लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीसमोर २६ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणारे मेट्रो भवनचे बांधकाम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. भवनच्या छतावर नेट मीटरिंगसाठी सोलर पॅनल आणि जमिनीच्या आतील थंडावा ओढून इमारत थंड ठेवण्यासाठी जिओथर्मल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ऊर्जेची बचत होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो स्टेशनच्या पाहणी दौऱ्यानंतर मेट्रो हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.दीक्षित म्हणाले, महामेट्रो साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी एअरपोर्टचे ९० टक्के बांधकाम झाले आहे. ५ कि़मी.च्या जॉय राईडसाठी महामेट्रो सज्ज असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तच्या (सीएमआरएस) अंतिम मंजुरीवर जॉय राईड अवलंबून आहे. सीएमआरएसचा दौरा २० मार्चला होण्याची शक्यता आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे नियमित सुरक्षा आॅडिट, आकस्मिक तपासणीसह आतापर्यंत एनसीसी, एफ्कॉन्स, आयटीडी सिमेंटेशन आणि आयएल अॅण्ड एफएस या कंपन्यांवर ४० लाखांचा दंड आकारला आहे. मेट्रो वाहनाद्वारे मेट्रोच्याच हाईट बॅरिअरला टक्कर मारणाऱ्या वाहनचालकाला निलंबित करण्यात आले आहे.
कॉटन मार्केटमध्ये मेट्रो स्टेशन आणि मल्टी मॉडेल हबदीक्षित म्हणाले, मेट्रो स्टेशन आणि मल्टी मॉडेल हब बनविण्यासाठी कॉटन मार्केटची १७ एकर जमीन मिळाली आहे. नागपूर स्टेशनसमोरील दुकानदारांना आणि एमपी बसस्टॅन्डला शिफ्ट करण्यात येईल. तसेच फुले मार्केट येथील व्यापाऱ्यांना जागा देण्यात येईल. खवा मार्केटची तीन एकर जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी खवा व्यापाऱ्यांसाठी मोठे मार्केट बनविण्यात येईल.
छत्रपती चौकात दोन सिम्बॉलिक पिलर उभारणारदीक्षित म्हणाले, छत्रपती उड्डाण पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणी दोन पिलरची ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणार होतो. पण डबल डेकर पूल तयार करताना दोन्ही पिलरचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याला २० दिवसांपूर्वी तोडण्यात आले. आता त्या ठिकाणी दोन छोट्या आकाराचे सिम्बॉलिक पिलर बनविण्यात येईल. ते म्हणाले, नागपूरच्या आसपासच्या शहरात लोकल मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे लवकरच पाठविण्यात येईल. रेल्वेची मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील.
चीनमध्ये तयार होतेय कोचचे मॉडेलदीक्षित म्हणाले, चीनची मेट्रो रेल्वे कंपनी सीआरआरसीने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी कोचचे मॉकअप (मॉडेल) बनविणे सुरू केले आहे. हे मॉडेल १५ एप्रिलपर्यंत तयार होेईल. तयार कोच सप्टेंबरपासून नागपुरात येतील. नागपूर मेट्रोकरिता सीआरआरसीकडून जवळपास ८५० कोटी रुपयात ६९ कोच (२३ मेट्रो ट्रेन) खरेदी केल्या आहेत. सीआरआरसी नागपुरात कोच कारखाना सुरू करण्यास सकारात्मक आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई मेट्रोकरिता कोचचा आॅर्डर मिळावा, अशी कंपनीला अपेक्षा आहे. कचरापारा (प. बंगाल) येथील रेल्वेची निविदा रद्द झाल्याने आणि अहमदाबाद येथे सीआरआरसीला टेंडर न मिळाल्याने कंपनी नागपुरात कारखाना सुरू करण्यास इच्छुक नसल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
तीन स्टेशनचे बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण होणारसाऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी येथे स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. आतापर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्ण आहे. खापरी स्टेशन बांद्रा स्टेशनच्या व्हिक्टोरियन आर्किटेक्चरवर आधरित आणि न्यू एअरपोर्ट स्टेशन बुद्धिस्ट थीमवर असून तशी रचना आहे. साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर व्यावसायिक उपयोगासाठी १० हजार चौरस फूट हॉलची निर्मिती केली आहे. तसेच एस्केलेटर, लिफ्ट, वॉशरूम, ड्रिंकिंग वॉटर फाऊंटेन, सायकल ट्रॅक, सायकल डॉकिंग स्टेशन, बस बेस, तिकीट काऊंटर, दिव्यांगांसाठी विशेष प्रकारच्या टाईल्स, एएफसी गेट, डोर फ्रेम मेटल डिटेक्टर आदींची व्यवस्था आहे. साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर फूटओव्हर ब्रिज तर अन्य दोन स्टेशनवर सब-वे बनविण्यात आले आहे. न्यू एअरपोर्ट स्टेशनवर चिचभुवन येथील लोकांसाठी आरयूबी बनविण्यात येणार आहे.