नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान आता हळूहळू बसेसचे संचालन सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारी गणेशपेठ बसस्थानकावरून एकूण आठ बसेसचे संचालन करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या बसेसने सायंकाळपर्यंत एकूण २६ फेऱ्या केल्या.
एक दिवसापूर्वी एसटी बस स्टँडवरून सावनेरकरिता दोन बसेस चालवून याची सुरुवात करण्यात आली होती. मंगळवारी रामटेक, काटोल, सावनेर, उमरेड आणि भंडाराकरिता आठ बसेस चालविण्यात आल्या. बसेसची संख्या दरदिवशी वाढण्याची शक्यता आहे. संपानंतरही २० पेक्षा जास्त चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटी बजावली. कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या एक महिन्यापासून एसटी बस न धावल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. मंगळवारी जवळपास १५ विद्यार्थी काटोलहून एसटी बसमध्ये बसले. अन्य ठिकाणचे विद्यार्थी एसटी बसेसचा उपयोग करून शाळेत जातील आणि परततील. बस रवाना करताना मंडळ नियंत्रक नीलेश बेलसरे, गणेशपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर, तनुजा कलमेश, जिल्हा वाहतूक अधिकारी राजेश दाचेवार, अभय बोबडे उपस्थित होते.