नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूरमार्गे पुणे-कामाख्या-पुणे २६ स्पेशल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी सुविधा झाली आहे. नागपूर-पुणे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो. या मार्गावरील प्रवाशांना नेहमीच वेटिंगचे तिकीट हातात मिळते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावर २६ सुविधा स्पेशल रेल्वेगाडीच्या फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ८२५०५ पुणे-कामाख्या ही गाडी पुण्यावरून ५ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान प्रत्येक गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सुटून कामाख्याला तिसऱ्या दिवशी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ६ जानेवारी ते ३१ मार्चला नागपुरात रात्री १.२० वाजता येईल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ८२५०६ कामाख्या-पुणे ही गाडी २ जानेवारी ते २७ मार्च दरम्यान प्रत्येक सोमवारी रात्री ११ वाजता कामाख्यावरून सुटेल. ही गाडी पुण्याला चौथ्या दिवशी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी बुधवारी ४ जानेवारी ते २९ मार्च दरम्यान नागपुरात सकाळी ११.१५ वाजता येईल. या गाड्यांना न्यू बोंगईगाव, न्यू कुचबेहर, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालदा टाऊन, अंदल, आसनसोल, पुरुलिया, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, भुसावळ, नाशिक, पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीत एकूण १४ कोच असून त्यात एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित,आठ स्लिपर, एक साधारण द्वितीयश्रेणी आणि दोन एसएलआर कोचचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
नागपूरमार्गे पुण्यासाठी २६ सुविधा स्पेशल फेऱ्या
By admin | Published: December 26, 2016 2:50 AM