नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीची मोहीम नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य मुख्य नेत्यांना ई-मेल पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांचा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागपुरातून केवळ २ दिवसांत २६ हजारावर ई-मेल पाठविण्यात आले आहेत. यामुळे मोहिमेची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. युवा विदर्भवादी नेत्यांनी सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेता १६ जुलैपासून ‘ई-मेल’ मोहीम सुरू केली आहे. यांतर्गत नागरिकांना त्यांच्या अकाऊंटमधून वरील नेत्यांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ई-मेल पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवारी सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात ही मोहीम राबविण्यात आली. येथून १५ हजारावर नागरिकांनी ई-मेल पाठविले. याप्रसंगी विदर्भवादी नेत्यांनी विविध घोषणा देऊन स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. पहिल्या दिवशी कॉम्प्युटर इन्स्टिट्युटस्मध्ये मोहीम राबविण्यात आली होती. सोमवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ई-मेल पाठविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मोहिमेत युवा आघाडीचे नागपूर विभागाध्यक्ष डॉ. दीपक मुंढे, महिला आघाडीच्या विदर्भ विभागाध्यक्षा अॅड. नंदा पराते, समितीचे शहराध्यक्ष दिलीप नरवडीया, शहर महासचिव सुनील खंडेलवाल, अरुण केदार, राहुल पवार, अश्वजित पाटील, मंगेश डोंगरे, प्रशांत महल्ले, धर्मराज रेवतकर, विनय पाटील, अविनाश सुलताने, अनंत पेसोडे, रत्नेश वानखेडे, अमित रॉय, शुभम हिवराळे, श्याम वाघ, शकुंतला वट्टीघरे, शुभम शेंडे, रेखा मोहाडीकर, वीणा पौनीकर, कल्पना मोहाडीकर, प्रफुल्ल डोबारकर, हर्षल पराते आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) ३१ जुलैला ‘मोबाईल हँग’ आंदोलन युवा आघाडीतर्फे ३१ जुलै रोजी ‘मोबाईल हँग’ आंदोलन करण्यात येणार आहे. यांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, अंबरीश आत्राम, आशिष देशमुख आदींना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहेत. ९ आॅगस्टला गडकरी वाड्यापुढे आंदोलन ९ आॅगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यापुढे भव्य जनआंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचा संपूर्ण विदर्भात प्रचार केला जात आहे. त्यासाठी विविध छोटी आंदोलने आयोजित केली जात आहेत. आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे हा प्रयत्न आहे.
स्वतंत्र विदर्भासाठी २६ हजारावर ई-मेल
By admin | Published: July 18, 2016 2:39 AM